रेनवॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज
मित्रांनो उन्हाच्या व दुष्काळाच्या झळा आपण सारेच झेलतोय.
उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, दुष्काळी परिस्थिती आपल्याकडे पाचवीलाच पुजलेली असते. बोअरवेल व विहिरी कोरड्या पडतात. हंगामी नदीपात्र देखील कोरडं पडतं.
याउलट पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस, महापूर, अशी परिस्थिती. पडलेला हा जास्तीचा पाऊस समुद्राला वाहून जातो. हाच जास्तीचा पाऊस उपयोगात आणावा यासाठी नदीजोड ही संकल्पना पुढे आली. पण ती अस्तित्वात यायला अजून बराच काळ लागेल.
आणखी एक संकल्पना म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग!
त्यातही अजून एक संकल्पना म्हणजे बोअरवेल पुनर्भरण!
शेतीसाठी, घरगुती वापरासाठी शेकडो फूट बोअर मारून भरमसाठ भूजलाचा उपसा केला जातोय. पण हा भूजलसाठा केव्हातरी संपेल. मग पुढे काय?
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या पावसाळ्यापासूनच बोअरवेल पुनर्भरण करून भुजलसाठा वाढवायला हवा. पावसाचे पाणी पन्हाळी व पाईपद्वारे नैसर्गिक फिल्टर बसवून पुन्हा बोअरवेलमध्ये सोडल्यास भुजलसाठा व जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढेल!
आमच्या घरच्या बोअरवेलचे, गावातील अनेक बोअरवेलचे व शाळेतील बोअरवेलचे या पद्धतीने गेली काही वर्षे पावसाळ्यात पुनर्भरण केल्याने भूजलपातळीत वाढ होऊन पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले. जानेवारी महिन्यातच आटून जाणाऱ्या बोअरवेलचं पाणी आत्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंतही मुबलक असतं.
घराच्या, इमारतीच्या छतावर, टेरेसवर पडलेलं पावसाचे पाणी पन्हाळी व पाईपद्वारे, पाईपमध्येच लहानमोठी वाळू, कोळसा, दोन्ही बाजूने बारीक तारेची गाळणी, असे नैसर्गिक फिल्टर बसवून पुन्हा बोअरवेलमध्ये सोडल्यास भुजलसाठा व जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढेल! व छतावर पडणारे हे लाखो लिटर शुद्ध पाणी बोअरवेलच्या छिद्रातून थेट जमिनीतील पोकळ्यांमध्ये साठून राहील. परिसरात असणाऱ्या हजारो बोअरवेलचे असे जर पुनर्भरण प्रत्येकाने आपापल्या बोअरवेलचे केले तर कमी झालेली भूजल पातळी झपाट्याने वाढून अतिरिक्त प्रमाणात पडलेल्या पावसाची नैसर्गिक साठवण होईल. व उन्हाळ्यात जी भीषण पाणीटंचाई निर्माण होते त्यास आळा बसेल. परिसरातील विहिरींची देखील आपोआपच पाणीपातळी वाढेल..... बरं यासाठी येणारा खर्च देखील अत्यंत कमी आहे.
मित्रांनो! चला तर मग,
आपणही या मोहिमेत सहभागी व्हा!
व आपल्या पुढच्या पिढीसमोर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वेगळा आदर्श निर्माण करुया.
https://youtu.be/OkeMt1cM6ys