कोविड 19 च्या काळातील शिक्षण

 


कोविड काळातील शिक्षण आणि पालक

श्री. शरद लक्ष्मण पांढरे, शहापूर 


           कोविड १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेला लॉकडाऊनमुळे  खरंतर संपूर्ण जगच काही महिने जणूकाही थांबलं होतं. स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अगदी मार्च महिन्याच्या मध्यापासून शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात जोडून ठेवणे, त्यांना मानसिक आधार देणे, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करणे, स्वयंअध्ययनासाठी मुलांना कसं प्रेरित करता येईल यासारखी नवी आव्हाने उभी राहिली. यावर उपाय योजना करण्यात राज्यभरातील असंख्य शिक्षक पुढे सरसावले. नवीन पायवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. 
         अगदी एप्रिल महिन्यापासूनच त्यांनी  व्हाट्सअँप ग्रुप करून विद्यार्थ्यांना कोरोना संकटाच्या लॉकडाऊन कालावधीत उपलब्ध साहित्याचा वापर करून अभ्यास कसा करावा यासाठीची व्हिडिओ मालिका सुरू केली व ते या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले. आपल्या बऱ्याच शिक्षकांनी अगदी आपल्या दुर्गम भागातील व वाड्यापाड्यांवरील  आदिवासी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांना या संकटकाळात मानसिक आधार दिला.
          या संकट काळात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून यूट्यूब चॅनेलवर व ब्लॉगवर शेअर करत आहेत व त्याच्या लिंक्स केवळ आपल्याच विद्यार्थ्यांपूरत्या मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांना व्हाट्सअँप द्वारे पाठवून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.  दर्जेदार मार्गदर्शन व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार करून पाठवत आहेत. इतर अध्ययन पूरक शैक्षणिक मार्गदर्शन सर्वच जण करत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना एकाच वेळेस मोबाईल व नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन वर्ग घेण्यास इच्छाशक्ती व क्षमता असूनही अडचणी येत आहेत.  परंतु आपल्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन पोहचत नाही हे लक्षात आल्यानंतर वाड्यापाड्यांवर प्रत्यक्ष भेटी देऊन ऑफलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन व्हिडिओ व ऑडिओ उपलब्ध करून देत आहेत. स्वतःचे लॅपटॉप व मोबाईल यांच्याद्वारे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
         या शैक्षणिक वर्षांत दरवर्षी जूनमध्ये सुरू होणाऱ्या शाळा नोव्हेंबर नंतर सुरू झाल्या. परंतु सर्वच ठिकाणी सुरू झाल्या नाहीत.  थोड्याच दिवसात कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुरू असलेल्या शाळाही बंद झाल्या. विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. या विद्यार्थ्यांचा वेगळा अभ्यास आणि विचार करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यातच झपाट्याने वाढत जाणारी रुग्ण संख्या तसेच सर्वच विद्यार्थ्यांची व जनतेची सुरक्षा ही अतिमहत्वाची असल्याने अखेर नाईलाजास्तव परीक्षा रद्द करण्यात आल्या. याच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसल्या. काही विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही परीक्षेची तयारी केली होती त्यांना फारच वाईट वाटणे साहजिकच होते. परंतु व्यापक विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. अर्थात यापुढे प्रवेशाबाबत आव्हाने निर्माण होतीलच. पण आजच्या घडीला लाखो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळालेला दिलासा हेही थोडं नाही. अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. येत्या काळात त्यातूनही मार्ग निघेलच.
           मुलांची अवस्था तर पिंजऱ्यात असलेल्या पक्षाप्रमाणे झाली. खिडकीजवळ बसून टकमक बघत बसणं. किंवा ज्यांच्या घरात टीव्ही मोबाईल आहेत त्यांच्याशी खेळत बसणं. शहरी व ग्रामीण भागातील जी मुलं ऑनलाईन क्लास अटेंड करत होती ती देखील दररोजच्या ऑनलाईन  अभ्यासाला कंटाळा करायला लागली. पण मुलांच्या ह्या प्रचंड एनर्जीला विधायक वळण देणं गरजेचं आहे. त्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल.  दैनंदिन शालेय पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर अवांतर वाचन करण्याची त्यांना सवय लावावी लागेल. किशोर, चांदोबा, गोष्टींची पुस्तके यांसारखी पुस्तके वाचावयास सुरुवातीस प्रेरित करावे. त्यानंतर हळूहळू आत्मचरित्रे, ऐतिहासिक, वैज्ञानिक पुस्तके वाचावयास सांगावी. त्यांच्याविषयी चर्चा करावी. त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण झाले की आपोआपच त्यांना वाचनाचा व्यासंग जडेल.
           डायरी लेखन किंवा रोजनिशी लिहिण्याची सवय देखील मुलांमध्ये वृद्धिंगत करावी जेणेकरून आपले अनुभव त्यांना शब्दबद्ध करता येतील. तसेच लेखनाचा देखील सराव होईल.
            महाभारतातील एकलव्याचे उदाहरण मला या परिस्थितीत समर्पक वाटते. स्वअभ्यासाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील एकलव्य होईल. एकलव्याने आपल्या गुरूच्या अनुपस्थितीमध्ये स्व-अभ्यास करून धनुर्विद्या प्राप्त केली व तो त्यात पारंगत झाला होता. आताच्या परिस्थितीमध्ये शिक्षक मुलांसोबत नसताना त्यांना  स्वअभ्यासाची एक मोठी संधी आहे. त्याचबरोबर तसं पाहिलं तर शाळेमध्ये, क्लासमध्ये जाण्यासाठी लागणारा आपला वेळ हा त्यांना वाचन पाठांतर यांसारख्या विधायक कामांसाठी लावता येईल.
          आपल्या मुलांची मनस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना त्यांचे छंद जोपासायला मदत करावी लागेल. एखादे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट (बासरी, तबला, हार्मोनियम, ऑर्गन इ.) वाजवण्यास, गायन करण्यास, चित्रकाम, रंगकाम, मातीकाम कोलाज, कागदाची नक्षी, कथाकथन, अभिनय इ. करण्यास मुलांना व्यस्त ठेवावे. त्यांना तशा संधी उपलब्ध करुन द्याव्यात.  त्यांना त्यांची आवड जोपासण्यास त्यांना प्रेरणा द्यावी. निसर्गाचं, पानाफुलांचं, पशुपक्षांचं इ.च निरीक्षण करण्यास मुलांना प्रेरणा द्यावी. छोटेछोटे वैज्ञानिक प्रयोग करण्यास व खेळणी तयार करण्यास, तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे इ. ना प्रेरणा द्यावी. 
           ज्यांना शक्य आहे व ज्यांच्याकडे कॉम्पुटर, मोबाईल उपलब्ध आहे त्या पालकांनी आपल्या मुलांना कोडींग सारखे नवीन कौशल्य देखील शिकवायला हरकत नाही. पण हे करतांना त्यांचा स्क्रीन टाईम अति वाढणार नाही याची देखील दक्षता घ्यावी.
           तसं पाहिलं तर डोरेमॉन, भीम यांसारख्या  कार्टून युक्त मालिकांमधून देखील विद्यार्थ्यांवर एक चांगला प्रभाव पडत असतो. एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या या मुलांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची प्रचंड आवड व आकर्षण असतं. एक पालक म्हणून आपण त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. खरंतर या काही  मधून अनेक मॉरल स्टोरीज, चांगलं कसं वागावं किंवा आपण दुसऱ्यांना मदत कशी करावी किंवा एखादी कठीण व आव्हानात्मक परिस्थिती असेल तर त्या वेळेस आपण इतरांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे सर्व मुलं शिकत असतात. त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन देखील विकसित होण्यास मदत होते. असंख्य साहस कथा त्या मध्ये समाविष्ट आहेत. त्यातून चांगल्या गोष्टीचा विजय होत असतो आणि वाईट व चुकीच्या गोष्टी करतो तर त्या चुकीच्या असल्याने त्या टाळाव्यात हे देखील मुलं शिकत असतात. त्यांना त्यातून परावृत्त न करता आपण त्यांच्यासोबत बसून त्या पहाव्यात. त्यांना हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण सांगू शकतो की तू जर भीम असता तर काय केलं असतं? असे प्रश्न विचारून त्यांना विचार करायला लागले तर त्यांच्या विचार शक्तीस चालना मिळून मुलं क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागतील. 
             त्याचबरोबर ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या जीवनपटावर एक मालिका आहे ज्यात  प्रत्यक्ष बाबा साहेबांचा जीवनपट उलगडला आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि पुढे गेले. आणि पुढे जाऊन ते घटनेचे शिल्पकार झाले आणि या सगळ्या बाबी  मुलांना खुप काही शिकवत असतात. त्यांचं बालपण दाखवलं जायचं त्यामध्ये बाबासाहेबांना असणारी पुस्तकांची आवड मुलांना खूप प्रेरित करते. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ तसेच  ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकांनी  तर इतिहास जिवंत केलेला आहे. या सगळ्या बाबी आवडीने मुलं पाहत असतात. त्यातूनही शिकत असतात आता या सुटीच्या काळामध्ये यातूनही मुलांचे शिक्षण होत असतं 
             तर रामायण आणि महाभारत यांचे जुने एपिसोड लहान मुले देखील खूप उत्सुकतेने पाहत असतात. आता हे  एपिसोड्स पाहून बऱ्याच जणांचे ते पूर्ण रामायण महाभारत कथा बघून झाले. त्यांनी ते वाचून समजून घेतले असते का तर ते सांगता येत नाही. पण यातून मात्र ते त्यांच्या मनःपटलावर बिंबवले गेले कारण ऑडिओ व्हिजुअल प्रभाव चांगला होत असतो. यातून  भाषादेखील आपसूकपणे ही मुलं शिकत आहेत. पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्याला त्यांची ही अभिरुची आणि त्यांनी घेतलेले शिक्षण ही एक पालक म्हणून किंवा  त्यांना प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणून आपण त्यांना पुढचं देता येईल का? विविध भूमिकाभिनय अथवा नाटयीकरण करण्यास प्रोत्साहन दिले तर त्यातूनही मुलांचं शिक्षण होत असतं. 
            खरंतर कोविडने बऱ्याच अडचणी, आव्हाने निर्माण केली परतू त्याचसोबत बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या. समायोजन करायला शिकवलं, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावल्या,  मुलांना स्वअभ्यास करून बऱ्याचशा गोष्टी ज्ञात करून घ्यायला एक संधी देखील निर्माण झाली आहे. फावल्या वेळात  मुलं पालकांना त्यांच्या कामात, घरकामात मदत करतात हे देखील शिक्षणच आहे. हे आपण जाणले पाहिजे. काही मुलं तंत्रज्ञान वापरून आपले ड्रॉईंगचे, कोडिंगचे धडे स्वतःच गिरवायला लागले. हाही एक सकारात्मक बदल आपण लक्षात घ्यायला हवा. आता फक्त आपण आपल्या अपेक्षा मुलांवर न लादता पालक म्हणून त्यांना समजून घ्यावं. त्यांचे मित्र बनून त्यांच्या आवडी निवडीच्या क्षेत्रात त्यांना अधिक संधी व साधने उपलब्ध करावीत. शक्य तेथे त्यांच्या शिक्षकांची मदत घ्यावी.  परीक्षा हे विद्यार्थी काय शिकले किंवा त्यांनी कोणत्या क्षमता प्राप्त केल्या यांचे मापन करण्याचे एक साधन आहे, ते साध्य नाही हे देखील आपण लक्षात घ्यावे. अनौपचारिक माध्यमांतून देखील मुलं शिकत असतात. 
- श्री. शरद लक्ष्मण पांढरे, शहापूर




2.
कोविड 19 च्या काळातील शिक्षण
        अचानक उद्भवलेल्या कोविड १९ च्या साथीने मार्चच्या मध्यापासून आश्रमशाळांना शासनाच्या आदेशान्वये सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणि प्रवाहात जोडून ठेवणे, त्यांना मानसिक आधार देणे, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करणे, स्वयंअध्ययनासाठी मुलांना कसं प्रेरित करता येईल यासारखी नवी आव्हाने उभी राहिली. यावर उपाय योजना करण्यात राज्यभरातील काही शिक्षक पुढे सरसावले. नवीन पायवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. 
         अगदी एप्रिल महिन्यापासूनच त्यांनी इयत्ता १ली ते ४थी, ५वी ते ७वी, ८वी ते १०वी व ११वी-१२वी असे व्हाट्सअँप ग्रुप करून विद्यार्थ्यांना कोरोना संकटाच्या लॉकडाऊन कालावधीत उपलब्ध साहित्याचा वापर करून अभ्यास कसा करावा यासाठीची व्हिडिओ मालिका सुरू केली व ते या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले. आपल्या सर्व सहकारी शिक्षकांनी, मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने वाड्यापाड्यांवरील आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांना या संकटकाळात मानसिक आधार दिला.
         या संकट काळात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून यूट्यूब चॅनेलवर व ब्लॉगवर शेअर करत आहेत व त्याच्या लिंक्स केवळ आपल्याच विद्यार्थ्यांपूरत्या मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांना व्हाट्सअँप द्वारे पाठवून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.  दर्जेदार मार्गदर्शन व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार करून पाठवत आहेत. इतर अध्ययन पूरक शैक्षणिक मार्गदर्शन सर्वच जण करत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना एकाच वेळेस मोबाईल व नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन वर्ग घेण्यास इच्छाशक्ती व क्षमता असूनही अडचणी येत आहेत. 
        परंतु आपल्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन पोहचत नाही हे लक्षात आल्यानंतर वाड्यापाड्यांवर प्रत्यक्ष भेटी देऊन ऑफलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन व्हिडिओ व ऑडिओ उपलब्ध करून देत आहेत. स्वतःचे लॅपटॉप व मोबाईल यांच्याद्वारे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
       आदिवासी विकास विभागाच्या आदेशान्वये व मा. आयुक्त, अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने आश्रमशाळेचे शिक्षक दुर्गम भागातील वाड्यापाड्यांवर नियोजन करून भेटी देत आहेत. विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वाडीवर विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी काही स्थानिक माजी विद्यार्थ्यांना स्वयंसेवक नेमून त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला जातो. विद्यार्थ्यांना भेटीदरम्यान मार्गदर्शन, प्रेरणा, समुपदेशन केले जाते. पालकांना देखील मार्गदर्शन केले जाते. गावात भेटीदरम्यान ज्यांच्याकडे मोबाईल किंवा नेटवर्क आहे अश्या काका, मामा, दादा, ताई यांना विद्यार्थ्यांना दिवसातील थोडा वेळ त्यांचा मोबाईल उपलब्ध करून देऊन अधिकाधिक शैक्षणिक मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी मदत करण्यासाठी आवाहन करण्यात येते व त्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निसर्ग सानिध्यात, उपलब्ध जागेत हे अध्ययन अध्यापन कार्य परिसरातील वाड्यापाड्यांवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्यासाठी अधिक प्रेरणा शिक्षक देत आहेत.
      काही दात्यांकडे या विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना यश आल्यास भविष्यात ऑनलाईन वर्ग घेणेही शक्य होईल. सुदैवाने IIT मुंबईच्या CTARA विभागाचे प्रमुख डॉ आनंद राव सर यांनी माझ्या विनंतीवरून खूप सारे मिनी लॅपटॉप्स व टॅब्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचा फोन आला तेव्हा Fortis हॉस्पिटल मुलुंड येथे ICU त ऍडमिट होतो. Discharge मिळल्याबरोबर दोन तीन दिवसात IIT मुंबईत जाऊन ते घेऊन आलो. डॉ. आनंद राव सरांसारखी समाजसेवी व चांगली देवमाणसे अजूनही समाजात आहेत. 
      आत्ता याच लॅपटॉप्स व टॅब्समध्ये मार्गदर्शनपर शैक्षणिक व्हिडिओ टाकून ऑफलाईन का होईना पण सुरू झाले आहे. बरेचसे ऑनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. 
       ही शैक्षणिक चळवळ सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.


No comments:

Post a Comment

Featured Post

शुभ दसरा

 दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे, आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌿 तुम्ही जिंकत राहा आणि तुम...